हृदय फेकले तुझ्या दिशेने

हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर


मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

--- संदीप खरे.

बॉस .....

बॉस .....
बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदिप खरे

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही

हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल पसरणे अवघड नाही

हसतो कारण दुसर्‍यानांही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही

हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.... 


"हसलो" च्या जागी "हसतो" नक्की कुठल्या कडव्यात सुरु होते
 यामध्ये confusion आहे....pls correct if its wrong....